ला फिएस्टा अल आन्सो : जॉन फ्रान्सिस्को फेरे
जॉन फ्रान्सिस्को फेरे यांनी हिस्पॅनिक भाषेत पीएच.डी. केली आहे. ते अमेरिकेतील ब्राऊन विद्यापीठात व्याख्याते, संशोधक आहेत. त्यांचं ललितलेखन हे थॉमस पायचॉन, डेव्हिड फोस्टर आणि जुऑन गॉयटीसोलो यांच्या उत्तर आधुनिक परंपरेतलं आहे. आगस्टीन फर्नान्डिस मॅलो, जेवियर काल्वो, एलॉय फर्नान्डेझ पोर्टा या नव्या पिढीतीतल तरुण स्पॅनिश लेखकांमध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. 1987 मध्ये त्यांचा ‘अजस्टे डी क्युन्टोस’ हा पहिला लघुकथा संग्रह प्रकाशित झाला. त्यानंतर ‘होमोनेजे ए ब्लँकानीव्हेस’ हे दुसरं पुस्तक यायला 2001 उजाडलं. सध्या फेरे यांच्या नावावर ‘मेटामॉर्फिर्सिस’ (2006) हा लघुकथासंग्रह आणि ‘ला व्ह्युएल्टा अल मुंडो’(2002), ‘आय लव्ह यू सेद’(2003) आणि ‘प्रॉव्हिडन्स’ (2009) या कादंब-या आहेत. यातल्या ‘ला व्ह्युएल्टा अल मुंडो’चं कौतुक समीक्षकांनीही केलंय. फेरे यांनी काही काव्यसंग्रहाचं संपादनही केलंय. सध्या ते दोन निबंधसंग्रहांचं काम करत आहेत. याशिवाय ते साहित्य, सिनेमा आणि कला या विषयांवर विविध नियतकालिकांतून नियमित लिखाणही करत असतात.
त्यांची ‘ला फिएस्टा अल आन्सो’ ही कादंबरी 2005 मध्ये प्रकाशित झाली. त्याचा अर्थ होतो ‘मुर्खाची मेजवानी’.
यात अकार्डिया नावाच्या एका देशाची कहाणी आहे. साध्या माणसांचा, साध्या घरांचा, लाकूडतोडीचा व्यवसाय करणा-यांचा हा देश. इथली माणसं आपली भाषा आणि परंपरेला जपत जगत असतात. जंगलं आणि कुरणांनी व्यापलेल्या हा सदाहरित देश परकीयांच्या दडपशाहीखाली भरडला जातो. या परकियांना त्यांची भाषा अवगत नाही की, त्यांच्या परंपरा ठाऊक नाहीत. या लोकांना स्थानिकांमधीलच काहींची साथ आहे. एक संघटना या परकियांविरुद्ध लढा पुकारते. हा लढा अनेक र्वष चालणार आहे, पण त्यातून नवी पहाट होणार आहे, असा तिच्या सदस्यांना विश्वास आहे. गोरका के हा या लढय़ाचा नायक आहे, एक म्हातारा पण हुशार लाकूडतोड्या. पण खरं तर तो सुपरहिरोच आहे. तो दहशतवादी आहे आणि क्रांतिकारीही आहे, तो गावंढळ आहे आणि चाणाक्षही. आधी संघटनेचा एक पदाधिकारी म्हणून तर नंतर एक सैनिक म्हणून तो या लढय़ात उतरलाय. अल्पावधीतच शस्त्र चालवण्याचं कौशल्य आणि देशप्रेमी कृत्यांमुळे तो लोकप्रिय बनलाय. पण त्याचं जीवन त्याला हव्या त्या पद्धतीनं चाललेलं नाही. गोरकाची जागा नंतर असंसस्कृत, रानटी आणि लिंगपिसाट घेतात. फेरेची ही कादंबरी पटकथेसारखी वाटत असली तरी तिला पटकथेचं लेबल लावता येत नाही. परिच्छेदामागोमाग परिच्छेद आणि प्रकरणांमागून प्रकरणं वाचकांना हिंदकळायला लावतात, आश्चर्याचे धक्के देतात. आपल्याला हे ठाऊक आहे असं वाचकाला वाटत असतानाच काहीतरी अनपेक्षित त्याच्यासमोर येतं. कादंबरीतील तर्कशास्त्र आणि लौकिक जगाचं तर्कशास्त्र यांच्यात पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत संघर्ष आहे.
फेरेची शैली विचित्र आहे. त्याच्या या कादंबरीतून सकारात्मक संदेश वगैरे काही मिळत नाही. ही एका आपल्या नियमाप्रमाणे चालणा-या योद्धय़ाची कहाणी आहे, एरवी पॉलिटिकल करेक्टनेसचा तिच्यात पूर्ण अभाव आहे, असं या कादंबरीबाबत समीक्षकांचं मत आहे, ते काहीसं खरंही आहे.