Tuesday, April 26, 2011

खरकटी अन्नसुरक्षा


फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
image

प्रत्येक लग्नात २० टक्के अन्न ताटात टाकणारे पाहुणे, हॉटेलांतही टाकून माजणारी गि-हाइकं.. देशात मध्यमवर्ग वाढतोय, खाण्यासाठी पैसा फेकला जातोय आणि उरलेलं जेवणही कच-यात जातंय.. दुसरीकडे, अन्नसुरक्षेबाबत भारताचा क्रमांक शंभरात 67वा! अन्न वाया जाऊ नये, यावरल्या उपायांची चर्चा केंद्रीय अन्नखात्यानं सुरू केलीय, पण ती कुणी गांभीर्यानं घेईल काय, याचं उत्तर शोधण्यासाठी ‘प्रहार’नं केलेला हा रिपोर्ताज..

अन्न हे पूर्णबह्मअसं समजणा-या आपल्या देशात गेल्या काही दिवसांपासून लग्न आणि अन्य समारंभामध्ये होणारी अन्नाची नासाडीहा विषय चर्चेत आला आहे. उपासमारीच्या बाबतीत भारताचा जगात 67वा क्रमांक आहे. देशातील अनेकांना एक वेळचं जेवणही मिळत नाही. एका बाजूला हे चित्र असताना दुस-या बाजूला अन्नाच्या नासाडीचा विरोधाभासही पाहायला मिळतोय. बहुतेक समारंभामध्ये 15 ते 20 टक्के अन्न वाया जातं, इतकं या नासाडीचं प्रमाण मोठं आहे. आपल्यासारख्या अफाट लोकसंख्येच्या देशाला ही नासाडी परवडणारी नाही. म्हणूनच ती रोखण्यासाठी काय करता येईल, या विषयावर आता विचार सुरू झाला आहे. याच दृष्टिकोनातून केंद्रीय अन्न आणि ग्राहक मंत्री के. व्ही. थॉमस यांनी नुकतीच एक बैठक बोलावली होती. या बैठकीत राष्ट्रीय सल्लागार परिषदेचे सदस्य (एन. ए. सी.) एन. सी. सक्सेना, माजी राज्यपाल सुदर्शन अग्रवाल, राज्यसभेचे खासदार राजीव शुक्ला हे मान्यवर उपस्थित होते. अन्नाची नासाडी टाळण्याचे अन्य देशात काही कायदे आहेत का, याचा अभ्यास या बैठकीत केला गेला. अन्नाची नासाडी टाळण्यासाठी पाकिस्तानातील वन-डिशम्हणजे लग्नसभारंभाच्या मेन्यूत मोजकेच पदार्थ ठेवण्याच्या कायदा अवलंबवण्याची तसंच 1960च्या दशकातली गेस्ट कंट्रोल ऑर्डरम्हणजे समारंभाला नेमकेच पाहुणे बोलावण्याची पद्धत पुन्हा आणण्याची शिफारस करण्यात आली. अन्नाची नासाडी आणि एकूणच भपकेबाजपणा टाळण्यासाठी आता जून महिन्यात राष्ट्रीय पातळीवर बैठक होणार आहे. तसंच अन्न सुरक्षेसंदर्भात विधेयक आणण्याचाही केंद्र सरकारचा विचार आहे.

या पार्श्वभूमीवर आपल्याकडे अन्नाची कुठे आणि कशी नासाडी होते, हे जाणून घेणंही महत्त्वाचं आहे. लग्न सभारंभातला बडेजाव ही चिंतेचीच बाब आहे. साध्या लग्नसमारंभाच्या जेवणातही कमीत कमी आठ-दहा प्रकारचे पदार्थ असतात. श्रीमंती थाटाच्या जेवणावळीतल्या पदार्थाची संख्या वीसच्या वर कितीही असू शकते. पण एका माणसाला एवढं सगळं खाणं अशक्यच असतं. त्यामुळे भरपूर जेवण वाया जातं. अर्थात केवळ लग्नातच नव्हे तर हॉटेल-रेस्टॉरंट, खाणावळी, हॉस्टेलच्या मेस, रुग्णालयं-कंपन्यांची-कार्यालयांची कँटीन इथेही मोठय़ा प्रमाणात अन्न वाया जातं. केवळ मुंबईविषयी सांगायचं तर मुंबईतील हॉटेलं आणि खाद्यपदार्थाचे स्टॉल दरवर्षी 21,900 टन अन्न कच-यात टाकतात. मुंबईतल्या आयआयटीच्या एका मेसमधून दररोज 130 किलो अन्न वाया जातं. हे दोन्ही आकडे या प्रश्नाचं गाभीर्य पुरेसं स्पष्ट करतात.

ही अन्नाची नासाडी मुख्यत्वे दोन प्रकारे होते. जेवायला येणा-या लोकांच्या कमी-जास्त प्रमाणामुळे शिल्लक राहणारं अन्न आणि लोकांनी ताटात सोडलेलं अन्न. यात ताटात सोडल्यामुळे वाया जाणा-या अन्नाचं प्रमाण खूप जास्त आहे. ताटात थोडं तरी शिल्लक ठेवणं ही गोष्ट स्टेट्स सिम्बॉल मानणारे आजही अनेक जण आहेत. तर नको असताना ताटात घेण्याचा हावरटपणाही याला कारणीभूत आहेच. एवढे पदार्थ देतोय म्हणून, आणि लोक टाकणारच, म्हणूनही केटर्सचं मार्जिनमात्र 400 ते 500 टक्क्यांपर्यंत गेलं आहे!

अन्नाच्या नासाडीमागे बदललेले आर्थिक-सामाजिक पैलूही आहेत. गेल्या काही वर्षात मध्यमवर्गीयांची संख्या वाढत चालली आहे. पैसे मोजून वस्तू विकत घेतल्यावर आपण तिचा कसाही उपभोग घेऊ शकतो, असं मानणाऱ्या या नवमध्यमवर्गाच्या अविचारी वृत्तीमुळेही अन्नाची नासाडी होते. खाओ, पिओ, मजा करोअशी मानसिकता असलेला हा वर्ग अन्नसुरक्षेच्या बाबतीतही तेवढाच बेफिकीर आहे, त्यामुळेच हॉटेलमध्ये डिशमध्ये अन्न टाकताना, लग्न किंवा इतर सभारंभाच्या मेजवानीत अनेक पदार्थ ठेवताना आपण अन्न वाया घालवतोय, हा विचारही त्याच्या मनात नसतो.

ताटात वाढलेलं जेवण किंवा खाद्यपदार्थ तो पूर्ण खाल्ला पाहिजे. मग तो घरातील असो वा उपहारगृहातील. शेवटी दोन्ही ठिकाणी पैसे खर्च केल्यानंतरच ते अन्न आपल्या ताटात पडत असतं. त्यामुळे त्याची नासाडी करणं म्हणजे आपण आपल्या पैशाची बरबादी करणंच असतं. हॉटेलात मिळणा-या थाळीचं किंवा राइस प्लेटचं उदाहरण घ्या. लहान-मोठय़ा सगळ्याच हॉटेलात मिळणा-या या थाळीत अनेक पदार्थ असतात. त्यातले निवडकच खाल्ले जातात आणि उरलेले ताटात तसेच सोडले जातात. यातून पैसा आणि अन्न या दोन्हीचा अपव्यय होतो. थाळीतले अमुक पदार्थ नकोत, असं आधी सांगता येऊ शकतं. अन्नाची नासाडी टाळण्याचा हा साधा उपाय आहे.

अन्नाची नासाडी हा खरं तर गुन्हा आहे, पण अनेकांच्या हे गावीही नसेल. म्हणूनच लोकजागृती हा अन्ननासाडी थांबवण्याचा प्रभावी उपाय असल्याचं तज्ज्ञ मंडळी म्हणतात. परंतु जेवणावळीवर निर्बंध लादले तर केटरिंगवाल्यांना ते मान्य होतील का, अन्ननासाडी प्रतिबंधक कायदा झाला तर त्याचे काय परिणाम होतील, त्याची कठोर अमलबजावणी होईल का, अशा अनेक प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न प्रहारच्या टीमने केला. अन्नाची नासाडी हा राष्ट्रीय प्रश्न आहे, मात्र मुंबईपुरता या प्रश्नाचा आढावा घेण्याचा प्रयत्न प्रहारने केलाय. त्यावरून देशभरातील परिस्थितीची कल्पना यावी.

शेवटी जो जे वांच्छील तो ते खावोहे खरं असलं तरी आपल्याला जेवढं हवं तेवढं ताटात घेणं शहाणपणाचंच ठरेल. अन्नसुरक्षेची जबाबदारी जेवढी सरकारची आहे, तेवढीच आपलीही आहे, याचं भान बाळगलंच पाहिजे.

Thursday, September 9, 2010

एका बेताल योद्धयाची कहाणी


फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
image

ला फिएस्टा अल आन्सो : जॉन फ्रान्सिस्को फेरे

जॉन फ्रान्सिस्को फेरे यांनी हिस्पॅनिक भाषेत पीएच.डी. केली आहे. ते अमेरिकेतील ब्राऊन विद्यापीठात व्याख्याते, संशोधक आहेत. त्यांचं ललितलेखन हे थॉमस पायचॉन, डेव्हिड फोस्टर आणि जुऑन गॉयटीसोलो यांच्या उत्तर आधुनिक परंपरेतलं आहे. आगस्टीन फर्नान्डिस मॅलो, जेवियर काल्वो, एलॉय फर्नान्डेझ पोर्टा या नव्या पिढीतीतल तरुण स्पॅनिश लेखकांमध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. 1987 मध्ये त्यांचा अजस्टे डी क्युन्टोस हा पहिला लघुकथा संग्रह प्रकाशित झाला. त्यानंतर होमोनेजे ए ब्लँकानीव्हेस हे दुसरं पुस्तक यायला 2001 उजाडलं. सध्या फेरे यांच्या नावावर मेटामॉर्फिर्सिस (2006) हा लघुकथासंग्रह आणि ला व्ह्युएल्टा अल मुंडो(2002), आय लव्ह यू सेद(2003) आणि प्रॉव्हिडन्स (2009) या कादंब-या आहेत. यातल्या ला व्ह्युएल्टा अल मुंडोचं कौतुक समीक्षकांनीही केलंय. फेरे यांनी काही काव्यसंग्रहाचं संपादनही केलंय. सध्या ते दोन निबंधसंग्रहांचं काम करत आहेत. याशिवाय ते साहित्य, सिनेमा आणि कला या विषयांवर विविध नियतकालिकांतून नियमित लिखाणही करत असतात.

त्यांची ला फिएस्टा अल आन्सो ही कादंबरी 2005 मध्ये प्रकाशित झाली. त्याचा अर्थ होतो मुर्खाची मेजवानी.

यात अकार्डिया नावाच्या एका देशाची कहाणी आहे. साध्या माणसांचा, साध्या घरांचा, लाकूडतोडीचा व्यवसाय करणा-यांचा हा देश. इथली माणसं आपली भाषा आणि परंपरेला जपत जगत असतात. जंगलं आणि कुरणांनी व्यापलेल्या हा सदाहरित देश परकीयांच्या दडपशाहीखाली भरडला जातो. या परकियांना त्यांची भाषा अवगत नाही की, त्यांच्या परंपरा ठाऊक नाहीत. या लोकांना स्थानिकांमधीलच काहींची साथ आहे. एक संघटना या परकियांविरुद्ध लढा पुकारते. हा लढा अनेक र्वष चालणार आहे, पण त्यातून नवी पहाट होणार आहे, असा तिच्या सदस्यांना विश्वास आहे. गोरका के हा या लढय़ाचा नायक आहे, एक म्हातारा पण हुशार लाकूडतोड्या. पण खरं तर तो सुपरहिरोच आहे. तो दहशतवादी आहे आणि क्रांतिकारीही आहे, तो गावंढळ आहे आणि चाणाक्षही. आधी संघटनेचा एक पदाधिकारी म्हणून तर नंतर एक सैनिक म्हणून तो या लढय़ात उतरलाय. अल्पावधीतच शस्त्र चालवण्याचं कौशल्य आणि देशप्रेमी कृत्यांमुळे तो लोकप्रिय बनलाय. पण त्याचं जीवन त्याला हव्या त्या पद्धतीनं चाललेलं नाही. गोरकाची जागा नंतर असंसस्कृत, रानटी आणि लिंगपिसाट घेतात. फेरेची ही कादंबरी पटकथेसारखी वाटत असली तरी तिला पटकथेचं लेबल लावता येत नाही. परिच्छेदामागोमाग परिच्छेद आणि प्रकरणांमागून प्रकरणं वाचकांना हिंदकळायला लावतात, आश्चर्याचे धक्के देतात. आपल्याला हे ठाऊक आहे असं वाचकाला वाटत असतानाच काहीतरी अनपेक्षित त्याच्यासमोर येतं. कादंबरीतील तर्कशास्त्र आणि लौकिक जगाचं तर्कशास्त्र यांच्यात पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत संघर्ष आहे.

फेरेची शैली विचित्र आहे. त्याच्या या कादंबरीतून सकारात्मक संदेश वगैरे काही मिळत नाही. ही एका आपल्या नियमाप्रमाणे चालणा-या योद्धय़ाची कहाणी आहे, एरवी पॉलिटिकल करेक्टनेसचा तिच्यात पूर्ण अभाव आहे, असं या कादंबरीबाबत समीक्षकांचं मत आहे, ते काहीसं खरंही आहे.

प्रारब्धवादाचं ओझं

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
image

अर्जेटिनात जन्मलेल्या अ‍ॅन्टिनिओ डी बेनेडेट्टोने स्पॅनिश भाषेत विपुल लिखाण केलं आहे. मुंडो अ‍ॅनिमल (1953), एल पेंटागोनो (1955), ग्रोट (1957) डिक्लीनेसियन एंजल (1957), एल कॅरिनो डे लॉस टोन्टोस (1961), एल सिन्सिरिओ (1964), लॉस सुसाइडस (1969), अ‍ॅबसॉडरेस (1978), सोंबेरास नॉडा मस (1984) यासारख्या कादंब-या आणि लघुकथा बेनेडेट्टोच्या नावावर आहेत.

अर्जेटिनात जन्मलेल्या अ‍ॅन्टिनिओ डी बेनेडेट्टोने स्पॅनिश भाषेत विपुल लिखाण केलं आहे. मुंडो अ‍ॅनिमल (1953), एल पेंटागोनो (1955), ग्रोट (1957) डिक्लीनेसियन एंजल (1957), एल कॅरिनो डे लॉस टोन्टोस (1961), एल सिन्सिरिओ (1964), लॉस सुसाइडस (1969), अ‍ॅबसॉडरेस (1978), सोंबेरास नॉडा मस (1984) यासारख्या कादंब-या आणि लघुकथा बेनेडेट्टोच्या नावावर आहेत. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांची पुस्तक अनेक भाषांत भाषांतरितही झाली आहेत. 1976च्या लष्करी राजवटीने त्यांना एक वर्षभरासाठी तुरुंगातही डांबण्यात आलं होतं. त्यानंतर ते स्पेनला निघून गेले होते. मृत्यूपूर्वी काही दिवस आधी ते परत अर्जेटिनाला आले.

1956 मध्ये प्रसिद्ध झालेली त्यांची झामाही विसाव्या शतकातील लॅटिन अमेरिकन साहित्यातील एक उत्कृष्ट कलाकृती समजली जाते. असं म्हणतात की, ती लिहिण्यासाठी बेनेडेट्टो यांनी पॅराग्वेच्या (जो एकेकाळी ब्युनॉस आयर्सची एक वसाहत होता) इतिहास आणि भूगोलावरील पुस्तकं घेऊन अनेक दिवस स्वत:ला एका खोलीत बंद करून ठेवलं होतं. या निवांतपणातून बेनेडेट्टोने प्रसवलेली ही कादंबरी म्हणजे निव्वळ इतिहासाचा अन्वयार्थ किंवा पुनर्लेखन नाही. तर ती अनुभवजन्य नैराश्य आणि गतानुगतिक प्रारब्धवादाचं ओझं वागवणा-या विसाव्या शतकातील एका नायकाच्या वेगळ्याच व्यक्तिमत्त्वाची कहाणी उलगडून दाखवते. हा नायक म्हणजे दिएगो डी झामा. तो वसाहतीच्या प्रशासनाचा एक अधिकारी आहे. असूनसिओनच्या गव्हर्नरचा सल्लागार म्हणून काहीसं संदिग्ध काम त्याच्यावर सोपवण्यात आलं आहे. यासाठी तो बायका-मुलांना सोडून या शहरात आला आहे. कादंबरीच्या सुरुवातीलाच बंदराच्या धक्क्याला बांधलेल्या एका जाळ्यात समुद्री लाटांवर हिंदकळणा-या माकडाच्या शवाचं वर्णन आहे. या वर्णनातून चिवट स्वभाव आणि संभाव्य ताटातूट, त्यांचा झगडा दिसतो. झामाची स्थितीही याहून वेगळी नाही, हेच लेखकाला यातून सुचवायचं असतं. ही कादंबरी नागरी अध:पतन आणि मुल्यांची घसरणदेखील अधोरेखित करते. ती अभिजात साहित्याचं सौंदर्य आणि दमदारपणा असलेली देखणी कलाकृती तर आहेच, शिवाय फारशी न दखल घेतलेली ती एक मास्टरपीसही आहे. बहुतेक लॅटिन अमेरिकन साहित्याच्या बाबतीत विलक्षण, जादूई वास्तववाद वरचढ ठरतो. ही लॅटिन अमेरिकेतील साहित्यिकांची त्या वेळी एकमेव शैली होती, असं म्हटलं जातं. पण झामादेखील तशीच कादंबरी असेल, असा समज असल्यास तो खरा नाही. या कादंबरी आत्मतत्त्ववादी, कालातीत शैली, वसाहतीचा अस्थिर भूतकाळ आणि निर्थक स्मृतींविषयी सांगते. त्या अशा देशांच्या आहेत जिथला निसर्ग कोपला आहे. या कादंबरीतील ठोस विधानं तिला विलक्षण वास्तववादाच्या पार पलिकडे नेऊन ठेवतात. निसर्गाची कुठलीही ठरलेली तत्त्वं नसतात. तो कधी निशब्द असतो, कधी क्रूर असतो. तो कधी शांत असतो, तर कधी विनाशक हा धडा या कादंबरीतून मिळतो.

ओळख शोधण्याची धडपड


फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
image

तामुझचं लेखन इस्रयलमधील जीवनापेक्षा इस्त्रायलबाहेरील इस्रयलींच्या जीवनाचं चित्रण अधिक करतं. इस्त्रायलींना बाहरेच्या जगात आपली ओळख तयार करण्यासाठी कसा संघर्ष करावा लागला आणि इस्त्रायलने मध्यपूर्वीय किंवा युरोपियन संस्कृतीऐवजी ‘मेडिटरेनियन’ संस्कृती कशी स्वीकारली, याचा उहापोह तामुझ करतो.

बेंजामिन तामुझ हा इस्त्रायली लेखक असला तरी मूळचा तो रशियातला. पाच वर्षाचा असताना त्याचे आई-वडील सोव्हिएत रशियातून पॅलेस्टाइनला आले. तामुझ केवळ लेखकच नव्हता तर पत्रकार, समीक्षक, चित्रकार आणि शिल्पकार असं हे रसायन होतं. त्यानं कायदा आणि अर्थशास्त्र या विषयांचं शिक्षण घेतलं असलं तरी इतिहास आणि कला हे त्याचे आवडते विषय होते. त्यामुळे त्याचं बरंचसं लेखन या अंगानेच झालं. गोल्डन सॅण्डही पहिली कादंबरी 1950मध्ये लिहिल्यानंतर त्याने हिब्रू भाषेत 10 कादंब-या, पाच लघुकथा, आठ मुलांसाठी पुस्तकं, दोन नाटकं असं विपुल लिखाण केलं. साधारणपणे इस्त्रायली लेखकांचा कल लघुकादंब-या लिहिण्याकडे असताना तामुझने मात्र दीर्घ कादंब-या लिहिल्या, हे त्याचं वेगळेपण. त्याच्या ब-याचशा साहित्याचं इंग्लिश, स्पॅनिश, जर्मन, इटालियन, फ्रेंच, तुर्किश, ग्रीक, इस्टोनियन, रशियन, अल्बेनियन, पोलिश, जर्मन, चायनीज, अरेबिक या भाषेत भाषांतरित झालं असलं तरी हायी एल्याकुमअजूनही इंग्रजीत भाषांतरित झालेली नाही.

त्याची हायी एल्याकुम’ (एल्याकुमचं जगणं) ही कादंबरी त्याच्या कादंबरी त्रयीतील पहिली कादंबरी. या त्रयीतल्या दुस-या भागाचं शीर्षक कॅसल इन स्पेनतर तिस-या भागाचं नाव हॅल्युसिनेशनआहे. हायी एल्याकुमही 1963मध्ये प्रकाशित झाली. हायी एल्याकुमही एका अ‍ॅण्टिहिरोची पर्यायाने इस्त्रायलच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील एका संपूर्ण इस्त्रायली पिढीची कहाणी आहे. या कादंबरीत इस्त्रायलचा कालखंड आणि दुस-या महायुद्धाची पार्श्वभूमी आहे. कादंबरीचा नायक इस्त्रायलच्या स्वातंत्र्याची लढाई लढतोय, परंतु व्यक्तिगत जीवनात तो पराभूत झाला आहे. त्याच्या साधेपणामुळे तो समाजात कुणालाच नकोय. त्यामुळेच तोही समाजापासून दूर पळण्याचा प्रयत्न करतो. या प्रयत्नात त्याला त्याची जीवनसाथी नुरा भेटते. तिची मूळं विदेशी आहेत. नंतर दोघं स्पेनला जातात. तिथे काही दिवस राहिल्यानंतर नायकाला पुन्हा आपल्या मायदेशी परतावं, असं वाटतं. पण तिथे पुन्हा तो एकटेपणाच्या गर्तेत सापडतो. आपल्या गतस्मृतींमध्ये हरवल्यानं वास्तवापासून दूर फेकला जातो. अखेरच्या कादंबरीत तो एका मनोरुग्णालयात पोहोचलेला असतो.

तामुझने हे सगळं काव्यात्म आणि विडंबनात्मक शैलीत मांडलंय. समीक्षकांच्या मते, या कादंबरीत त्याने इस्त्रायलच्या स्वातंत्र्याच्या लढाईतील एका तरुणाचं जे व्यक्तिरेखाटन केलं आहे ते आगळं आहे. ही कादंबरी ज्यू लोकांना इस्त्रायलच्या इतिहासाच्या मुळाशी घेऊन जाण्यात यशस्वी होते.

तामुझचं लेखन इस्रयलमधील जीवनापेक्षा इस्त्रायलबाहेरील इस्रयलींच्या जीवनाचं चित्रण अधिक करतं. इस्त्रायलींना बाहरेच्या जगात आपली ओळख तयार करण्यासाठी कसा संघर्ष करावा लागला आणि इस्त्रायलने मध्यपूर्वीय किंवा युरोपियन संस्कृतीऐवजी मेडिटरेनियनसंस्कृती कशी स्वीकारली, याचा उहापोह तामुझ करतो. त्याच्या हायी एल्याकुमया कादंबरीत याचंच प्रतिबिंब दिसतं.

Friday, August 13, 2010

ननायकाचा प्रवास


रॉड्रिगो रे रोसाने स्पॅनिश भाषेत बरंच लिखाण केलं आहे। पण तो ग्वाटेमालातून शिक्षण पूर्ण करून न्यूयॉर्कला येईपर्यंत त्याच्याबद्दल कुणालाच फारशी माहिती नव्हती.


रॉड्रिगो रे रोसाने स्पॅनिश भाषेत बरंच लिखाण केलं आहे. पण तो ग्वाटेमालातून शिक्षण पूर्ण करून न्यूयॉर्कला येईपर्यंत त्याच्याबद्दल कुणालाच फारशी माहिती नव्हती. 1980मध्ये तो मोरोक्कोला गेला आणि तिथे अमेरिकन लेखक पॉल बॉवेलचा आश्रित बनला. पॉल बोवेलनेच त्याचं काही लिखाण इंग्रजीत भाषांतरित केलं, पण द पाथ डबल्स बॅक’, ‘डस्ट ऑन द टंगआणि द बेगर्स नाइफही तीन पुस्तकं वगळता त्याचं इतर कुठलंही साहित्य इंग्रजीत आलेलं नाही. मात्र त्याची अनेक पुस्तक इटालियन, जर्मन, डच, डॅनिश, पोर्तुगीज आणि जपानी भाषेत भाषांतरित झाली आहेत. रे रोसाने विशेषत: कादंब-या आणि लघुकथा लिहिल्या. त्याचं लिखाण हे प्रामुख्यानं लॅटिन अमेरिकन आणि उत्तर आफ्रिकेतील दंतकथा आणि मिथकांवर आधारलेलं असतं.

त्याची ला ओरिला आफ्रिकाना’ (इंग्रजी अर्थ, द आफ्रिकन शोअर) ही कादंबरी उत्तर मोरोक्कोतील टॅन्जिअर्स या शहरात व त्याच्या आसपास घडते. चिलीचा जनरल ऑगस्टा पिनोचट याला 1989 ते 2000 या काळात लंडनमध्ये डांबून ठेवण्यात आलं होतं, त्या काळातलं हे कथानक आहे. कादंबरीतील मुख्य व्यक्तिरेखा काहीशी गूढ आहे. गंमत म्हणजे, कादंबरीची सुरुवात आणि शेवटातही ती कुठे दिसत नाही आणि इतरही वेळी ती असून नसल्यासारखी आहे. ती वाचकांसमोर येते ती निवेदकाच्या माध्यमातून. शेवट वगळला तर या व्यक्तिरेखेचं नावही वाचकांना कळत नाही. तो एक कोलंबियन तरुण पर्यटक असल्याचं तेवढं समजतं. त्याची पत्नी काली शहरात राहते. पण त्याला तिच्याकडे जाण्याची अजिबात घाई नाही. त्याचा पासपोर्ट हरवतो. तो नव्यानं मिळायला वेळ लागतो. या काळात त्याचं गतायुष्य वाचकांसमोर उलगडत जातं. राहण्याची सोय शोधत तो टॅन्जिअर्सच्या रस्त्यावर फिरत राहतो. या काळात बरेच जण त्याला मदत करतात, तर काही त्याचा वापरही करून घेतात.

हा कोलंबियन पर्यटक ही या कादंबरीतील मुख्य व्यक्तिरेखा असली तरी ती कादंबरीचा नायक आहे, असं दोन कारणास्तव म्हणता येत नाही. एक म्हणजे, कादंबरीतील बराच भाग ती निष्क्रियच असते आणि कादंबरीला एकजीव ठेवण्यासाठीही तिचा काही उपयोग होत नाही. या कादंबरीतील प्रकरणं अत्यंत लहान म्हणजे काही तर एक पानीच आहेत. ती जिथे संपतात तिथे साधारणपणे इतर कादंबरीतील प्रकरणं वाचकाला गुंतवून ठेवतात किंवा कादंबरीला वेग देतात. पण यामुळे ला ओरिला आफ्रिकानाही कसलंही कथानक नसलेली (प्लॉटलेसनेस) कादंबरी वगैरे बनत नाही. उलट ती अत्यंत कौशल्याने गुंफलेली, लहान-मोठय़ा प्रश्नांची मालिका उपस्थित करणारी, त्याही पलीकडे नेमकं काय घडतंय, अशी उत्सुकता निर्माण करणारी कादंबरी बनते. या कादंबरीचा पोत पाहून तिला किरकोळम्हणण्याचा मोह होत असला तरी तो भ्रामक आहे. कारण या कादंबरीत उगाचंच तणाव करणं जाणीवपूर्वक टाळलं आहे. खरं तर ती एका मोठ्या आणि तातडीच्या विषयाला स्पर्श करते. तो म्हणजे आफ्रिका आणि युरोपमधील मानवी वाहतूक आणि त्याला जोडून असलेलं जग. वसाहतवादाचंच हे एका परीने टोक आहे. तंतोतंत दृश्यबांधणी आणि कथेचा नेमका प्रवास सांगणारी रचना यामुळे या कादंबरीतून एक तीव्र वास्तववादी परिणाम साधला जातो. हे रॉड्रिकोच्या लिखाणाचं वैशिष्टय़ आहे.

Saturday, July 17, 2010

वंचित आफ्रिकन इतिहास

आफ्रिका खंडात ब-याच भाषांत विपुल साहित्यनिर्मिती होत असते. मात्र भाषांतराच्या बाबतीत या भाषेतील अनेक साहित्यकृती कमनशिबी ठरल्या आहेत. कलोनियल म्हणजे इंग्रजी आणि फ्रेंच भाषांत अनेक आफ्रिकी भाषांतल्या साहित्याचं भाषांतर झालेलं नाही.

आफ्रिका खंडात ब-याच भाषांत विपुल साहित्यनिर्मिती होत असते. मात्र भाषांतराच्या बाबतीत या भाषेतील अनेक साहित्यकृती कमनशिबी ठरल्या आहेत. कलोनियल म्हणजे इंग्रजी आणि फ्रेंच भाषांत अनेक आफ्रिकी भाषांतल्या साहित्याचं भाषांतर झालेलं नाही. प्रकाशकांसाठी आफ्रिकन साहित्य बराच काळ अस्पृश्यच होतं. त्यामुळे या साहित्यकृती केवळ त्या त्या भाषेपुरत्याच मर्यादित राहिल्या आहेत. अलेम्सेयेड टेस्फे यांची ऐनाफेलाले ही साहित्यकृतीही अशीच कमनशिबी म्हणायला हवी. ऐनाफेलाले मूळची त्रिगिग्ना (किंवा ट्रिगिन्या) या भाषेतील कादंबरी आहे. ही भाषा इथिओपियाच्या एरिट्रिआ या भागात बोलली जाणारी भाषा. 1940 ते 1950 या काळतील एरिट्रिआतील राजकीय चळवळीवर ही 626 पानांची महाकादंबरी आधारित आहे. एन्फेलालया शब्दाचा अर्थ आम्हाला विभक्त करू नकाअसा होतो. हे 1940च्या काळातील एका वर्तमानपत्राचं घोषवाक्य होतं. या घोषवाक्याबरोबर हे वर्तमानपत्र हातात हात घेतलेल्या एका मुस्लिम आणि ख्रिस्ती माणसाचं छायाचित्रंही लोगो म्हणून वापरत असे. एन्फेलालएरिट्रियाची एकता राखण्यासाठी धडपडणा-या, मोठा त्याग करणा-या माता-पित्याची कथा आहे.

या कादंबरीचे लेखक अलेम्सेयेड हे इतिहासकार आहेत. त्यांनी लघुकथा, नाटकं आणि ललितेतर असं विविध प्रकारचं लेखन केलं आहे. त्यांच्या प्रमुख साहित्यकृतीमध्ये ऐन्फेलालखेरीज काब मॅटिएन्झो साब तेडला बायरूया पुस्तकाचा समावेश आहे. हेही पुस्तक एरिट्रियन इतिहासावर आधारलेलं आहे. त्यांची ही दोन पुस्तकं एकुणच आफ्रिकन साहित्याकडे पाहण्याचा पाश्चात्त्यांचा दृष्टिकोन बदलणारी आहेत, असं म्हटलं जातं. अलेम्सेयेड यांनी आपल्या काही साहित्यकृतींचं स्वत:च इंग्रजी भाषांतर केलेलं असलं तरी त्यांची एन्फेलालही इंग्रजी भाषांतरापासून अद्यापही वंचित आहे. या साहित्यकृतीचं केवळ टिग्रे या आणखी एका आफ्रिकन भाषेत अलिकडेच भाषांतर झालं आहे.